‘कोकीन ताना’ ते माझे ठाणे!

कृष्णार्पणमस्तु ऑनलाइन वृत्तएप्रिल 19, 2080 प्रतिक्रिया


सदानंद हॉटेलला लागून असलेल्या फूटपाथला बैलगाड्या असायच्या, त्यामध्ये जनावरांकरिता कडबा म्हणून पेंढा असायचा. मी व शाम होळीकरिता तो, गाडीवानाची नजर चुकवून पळवीत असू. पुढे त्याला लागून असलेल्या ट्रकमध्ये दगडी कोळसा असायचा, त्यातील २-३ तुकडे आम्ही पळवून शाळेमध्ये मुलांच्या केसांना लावत असू, त्याचा तडतड असा आवाज यायचा.
आज आपण जो मासुंदा तलाव पाहत आहोत, त्याचा मूळ विस्तार कौपीनेश्वर मंदिरापर्यंत होता. १९५० साली Thane  Borough Municipality ने तलावाचा १/३ भाग बुजवून ठाणे तलावपाळीची निर्मिती केली. तलाव पाळीला लागून अॅड. प्रभाकर हेगडे यांचे घर होते. मला त्यांच्या घराला लावलेल्या विविध रंगांच्या काचांबद्दल खूप कुतूहल होते. मला नंतर उलगडा झाला, की त्या Belgium glasses  होत्या.
ठाणे शहरामध्ये नव्या इमारतींचे बांधकामप्रसंगी खोदकामाच्या वेळेस बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडला. खोपट येथील सिद्धेश्वर तलावाशेजारी खोदकाम केले असता, तेथून चौमुखी ब्रह्मदेवाची प्राचीन मूर्ती सापडली, जी शिलाहारांपूर्वीचा काळ दर्शवते. चरई येथील खोदकामामध्ये मोडी लिपींत प्राकृत भाषेत लिहिलेला ताम्रपट सापडला, तो बाराव्या शतकातील आहे, असे जाणकारांचे मत आहे. त्याची प्रचिती येते. मी स्वतः त्याचे अवलोकन श्री. वाळिंबे (मोडी तज्ज्ञ) यांच्या सोबत केले असता, त्यामधील ‘विनायक’ हा शब्द फक्त परिचित वाटला. तेराव्या शतकात ज्ञानेश्वर माउलींनी आपल्यावर किती उपकार केले आहेत, याची जाणीव होते. सदर ताम्रपट नाशिक येथून आलेल्या पुरोहितांना यजमानांनी पौरोहितप्रीत्यर्थ प्रदान केला होता. संपूर्ण ताम्रपट अजूनही deciphered झालेला नाही.
अर्वाचीन ठाण्यात आपल्या पिढीने पाहिलेल्या, दोन वास्तू आता अस्तित्वात नाहीत : १) टेंभी नाक्यावरील समाधान हॉटेलसमोरील मुलींची शाळा, २) डॉ. भानुशाली हॉस्पिटलला लागून असलेली आणखी एक मुलींची शाळा.
ठाणे बाजारपेठेतच (महात्मा फुले मंडई) श्री. फडके यांची अरुणोदय प्रिंटिंग प्रेस ही १८९०मध्ये स्थापन झाली. तेथून भारतामधील पहिले पत्र ‘हिंदूपंच’ पाक्षिक प्रसिद्ध व्हायचे. लोकमान्य टिळकांनी ह्या प्रेसला भेट दिली होती. फडक्यांनी टिळक महाराजांना त्या काळी देशकार्याकरिता रुपये १,०००/-ची मदत केली होती. (त्या काळी कम्युनिस्ट, काँग्रेस, बीजेपी पक्ष असे वाद देशकार्याच्या आड येत नसत.)
सात राहटी विहीर ही जोशीवाड्याच्या बाहेर होती, तिची ख्याती फार मोठी होती. ठाण्यातील बरीच मोठी व्यक्तिमत्त्वे त्या विहिरीत पोहून गेले. प्रभाकर हेगडे, खंडू रांगणेकर, सतीश प्रधान, विजू दफ्तरदार, आनंद दिघे वगैरे. कारण, ही सगळी मंडळी टेंभी नाक्यावर बी.जे. हायस्कूलमध्ये शिकावयास होती, एम.एच. हायस्कूलच्या अगोदरची ठाण्यातील एकमेव नावाजलेली शाळा.
टेंभी नाका हे एक पूर्वीपासूनचे फार मोठे ऐतिहासिक ठिकाण. तिथे कोपऱ्यावर एक समाधान हॉटेल होते, आत्ता असलेल्या हॉटेलच्या समोर, रस्ता रुंदीकरणात ते पाडले गेले. समोरच्या बाजूला इराणी प्रकारचे छोटेसे हॉटेल होते, त्यात सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत रेडिओ वाजत असे. मी समोरच राहत होतो, गद्रे वाडीत. त्यामुळे लहानपणीच आमची सर्व जुनी गाणी पाठ झालेली होती.
आमच्या बाजूलाच सावंत मास्तरांचा गणपती होता. तेव्हा लोक रांग लावून गणपतीची आरास बघत असत, दुसऱ्या बाजूलाच डॉक्टर आबा प्रधान, डॉक्टर महाजन होमिओपॅथी तज्ज्ञ होते. त्या समाधान हॉटेलमध्ये स्वातंत्र्यकाळापासून ते शिवसेना स्थापनेपर्यंत राजकारणाची बरीच खलबते चालत होती. आपले प्रसिद्ध आनंद दिघे, सतीश प्रधानांच्या उदय तेथूनच झाला. आता सुजय हॉटेल आहे, तिथे एक लायब्ररी होती. तिथेपण बरीच मोठी मंडळी वाचण्यासाठी येत होती, बाजूलाच ब्रिटिशकालीन टाउन हॉल होता आणि त्यासमोरच आपले प्रसिद्ध कोर्ट, जे आजतागायत आहे. असे हे टेंभी नाका अजूनही आपले महत्त्व राखून आहे. ठाण्यातील राजकारणातील बऱ्याच घडामोडींचा प्रत्यक्ष साक्षीदार अल्लाउद्दीन, आता तो जांभळी नाक्यावर आहे. फारूक त्याच्याकडे कामाला होता.
ज्या शहराने आपणा सर्वांना आईची माया दिली, खेळवले, घडवले, भल्याबुऱ्या प्रसंगी साथ दिली, त्या ठाणे शहराचे  आपल्या सर्वांवर खूप उपकार आहेत. त्याची उतराई होणे अशक्य आहे, पण पुढच्या पिढीला याबद्दल माहीत होणे आवश्यक आहे.
ठाणे हे शिलाहार (शिंदे) घराण्याची राजधानी होती. प्रसिद्ध इतिहासकार अल्बेरुनी हा ठाण्याचा उल्लेख ‘कोकीन ताना’ असा करतो. चौदाव्या शतकात ‘चेंदणी’ व ‘महागिरी’ ही दोन प्रसिद्ध बंदरे होती. शिलाहारांनी चौदाव्या शतकात ठाणे बाजारपेठेमध्ये उभे असलेले प्रसिद्ध ‘कौपीनेश्वर’ मंदिर बांधले. पुढे पेशव्यांच्या सुभेदारानी त्याचा जीर्णोद्धार केला. सुभेदार श्री. बुआजी नाईक अंजुरकर ह्यांच्या पत्नीचे स्मारक दर्शनी भागांत आहे. ह्यानंतरचे प्राचीन मंदिर म्हणजे चेंदणी येथील प्रसिद्ध ‘विठ्ठल मंदिर’. हे मंदिर ४५० वर्षे प्राचीन आहे.
सातरहाटाच्या विहिरीबाबत काही आठवणी. तेथे शरद कुलकर्णी हे पॅथॉलॉजिस्ट राहत असत. त्यांच्या घराच्या दर्शनी भागातच त्यांची लॅबोरेटरी असे, लहानपणी खूप गंमत वाटे, ते पाहताना. त्या काळी ठाण्यामध्ये दोनच पॅथॉलॉजिस्ट होते. १) श्री. चाफेकर, २ ) श्री. कुलकर्णी.
माझे आजोळ डोंगरेवाड्यात, शेजारी गोडबोले वकिलांचा बंगला, मागे जोशीवाडा. रात्री नऊनंतर रस्त्यावरून कुल्फीवाले ओरडत जात, आम्ही वाड्याबाहेरील पत्र्यावर उभे राहून वाट बघायचो, तो दिसला की धावत घरात जाऊन ताटल्या, वाट्या, चमचे आणायचे. कुल्फीवाला त्याच्या टोपलीतून कुल्फीच्या नळ्या काढून हातात चोळून ताटलीत कुल्फी टाकायचा. तिची चव अजून आठवते, त्या ठाण्यातील सुट्ट्या अजूनही लक्षात आहेत.
तेथे लागून असलेल्या जोशीवाड्यात वीज कोसळून, पाहुणे म्हणून आलेल्या भावाबहिणीचा करुन अंत झाला. पहिल्या भारतीय चिकित्सक डॉ. आनंदीबाई जोशी (वाद नकोत) ह्यांचे वास्तव्यही काही काळ जोशीवाड्यांतच होते.
त्याबद्दल एक हृदय आठवण सांगतो. रात्री नऊनंतर खारकर आळीतील रस्त्यावरून कुल्फीवाले ओरडत जायचे. त्या काळी काडी असलेली कुल्फी नसायची. पानावर कुल्फी काढून तिच्या चकत्या करून देत असत. माझ्या वडिलांना थंड खाल्लेले अजिबात आवडत नसे. माझी आजी व मामी त्यांची नजर चुकवून मला कुल्फी देत असत.
पुढे मोठेपणी FDAमध्ये असताना असे लक्षात आले, हे सर्व कुल्फीवाले उथळसर येथील मैदानामध्ये मातीच्या भट्ट्यामध्ये दूध आटवतात. जवळजवळ पंधरा भट्ट्या होत्या. जड अंतःकरणाने ते ठिकाण उद्ध्वस्त करावे लागले.
त्या काळी ठाण्यामध्ये बरेच मान्यवर कम्युनिस्ट नेते होते. १) कॉम्रेड बाबूराव फडके (अरुणोदय वाले), २) साथी कृष्णा खोपकर (त्यांचे चिरंजीव मौ.ह.वि. ७३चेच), ३) कॉम्रेड प्रभा हळदनकर (पूर्वाश्रमीच्या प्रभा राजे, आपल्या सतीश हळदनकरची आई नाबाद ९३), ४) श्रीमती भानु नाडकर्णी (शहनाई वादक शैलेश भागवतची मावशी), ५) रावबा अनंत चिकणे (त्या वेळी खूपच तरुण होते); कृष्णा स्टोर्स, मंडप डेकोरेटर्सचे मालक श्री. छबूनाना जोशी हे ठाण्याचे भूषण आहेत. त्यानी गोरगरीब व धर्मादाय (charity) कामाकरिता विनामूल्य सेवा देऊ केली. छबुनानांनी एक अभिनव उपक्रम राबवला. त्या काळी पती निधनानंतर पत्नीचे मंगळसूत्र पतीच्या चितेवर ठेवण्याची प्रथा होती. छबूनाना प्रत्यक्ष स्मशानात जाऊन मृताच्या नातेवाइकांच्या संमतीने ते ताब्यात घेऊन ट्रस्टच्या स्वाधीन करायचे व त्या माध्यमातून समाजसेवा करावयाचे.
सैनिकांच्या मदतीकरिता प्रभातफेऱ्या निघत. कॉ. प्रभा हळदणकर आपल्या ठणठणीत आवाजात घोषणा द्यायच्या, ‘‘भारतीय जवानांच्या एकजुटीचा’’ आम्ही सारे एकसुरात ओरडायचो, ‘‘विजय असो!’’ शास्त्रीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन माझ्या आजोळी सर्व जण सोमवारी एक वेळ जेवत असू.
अजून एक आठवण, आपल्या बळवंत जोशींचे वडील श्री. यशवंत जोशी (ते कचेरीतून आल्यावर बल्याला A boy अशी हाक मारायचे, बल्या लगबगीने जाऊन त्यांच्या हातातील बॅग घेऊन यायचा) यांनी ST महामंडळाचा पाठपूरावा करून लालबाग येथे बसथांबा करून घेतला. याचे कारण असे की, ठाणे स्टेशनवरून एक रूट थेट चौपाटी येथे थांबा होता (टॉवर समोर), तेथे बस थांबायची, त्या काळी मो.ह. विद्यालयासमोर थांबा नसायचा व एक रूट डाव्या वळणाने थेट महाराष्ट्र विद्यालयासमोर जात असे, त्या काळी रंगायतन नव्हते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ठाण्याला वरचेवर येत असत. ते ठाण्याला आले की कोर्टाचे कामकाज आटोपल्यानंतर त्यांचा मुक्काम चित्रकार तासकर (माधवराव गडकरींचे मामा) यांच्याकडे असे. तेथे अॅड. शृंगारपुरे येत (समर्थ भांडारसमोरचे). बाबासाहेब त्यांना गमतीने ‘पगड़ी’ असे म्हणायचे. (अॅड. शृंगारपुरे म्हणजे मो.ह.वि. ७३च्या वंदना कारखानीस (बाबी)चे आजेश्वशूर). लोहार आळीतील शर्मिला ट्रॅव्हलचे नाना गुप्ते (ठाणे न.पा.चे माजी प्रतोद) यांच्याकडे बाबासाहेबांचे अस्सल हस्तांतरितील पत्र आहे. तसेच, खारकर आळीतील नामांकित वकील अॅड. प्रधान यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी सी.के.पी. हॉल येथे बाबासाहेबांनी सन्माननीय उपस्थिती लावल्याची नोंद आहे.
दूसरे असेच एक उत्तुंग व्यक्तिमत्व श्री. जयंतीलाल ठक्कर, अतिशय दानशूर. मो.ह.वि.च्या मागील बाजूपासून ते अॅड. भाऊराव ओक यांच्या ‘नंदादीप’ बंगल्यापर्यंत त्यांची मिळकत होती. ती जयंतीलालवाडी म्हणून प्रसिद्ध होती. ठाणे म्युनिसिपालिटी तिजोरीत खडखडाट होऊन कर्मचाऱ्यांचे वेतन न देण्याची नामुश्की ओढवली होती. त्या वेळेस जयंतीलाल शेठ यांनी सलग तीन महीने त्यांचे वेतन स्वखर्चाने अदा केले. श्री. जयंतीलाल यांच्या ऋणनिर्देशाशिवाय ठाण्याचा इतिहास व्यर्थ आहे.
कोर्ट नाक्यावरून K–villa येथे जात असताना, डाव्या बाजूस ‘रोमन प्रोटेस्टंट चर्च’ आहे. त्या वास्तूने देखील २०० वर्षांचा इतिहास पाहिला आहे.
सिव्हिल हॉस्पिटलवरून डॉ. आंबेडकर रोडला डावे वळण घेण्याआधी बेने इस्रायली समाजाचे प्रार्थनास्थळ (Synagogue), ‘शाआर हाश्शामाईम’ (A gate to heaven) आहे. त्या वास्तूलापण २०० वर्षांचा इतिहास आहे.
त्या काळी, म्हणजे जवळजवळ १०० वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीचे भय असायचे. त्या वेळी शहराच्या दाटीवाटीच्या भागांतून शहराबाहेर नागरिकांचे स्थलांतर केले जायचे. सुखवस्तू लोक रेल्वे स्टेशनसमोर, गोखले उपहारगृहाच्या मागील बाजूस, तर इतर लोक कॅसल मिल येथे हलविले जात. आजही कॅसल मिल परिसरांत प्लेग चाळ अस्तित्वात आहे.
संकलन : सुधीर चौधरी