राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक नियमानुसार रस्त्यांची कामे करावीत
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती निमित्त सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विकास कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई आणि दर्जाहीनता खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री सुनील केदार यांनी दिला.
सेवाग्राम विकास आराखड्यात करण्यात येत असलेल्या कामांची पाहणी करून पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली यावेळी श्री.केदार बोलत होते. यावेळी आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, कार्यकारी अभियंता गजानन टाके, मीरा अडाळकर, जेजे स्कुल ऑफ आर्टसचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मेंढे व बोरकर व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
पवनारला धाम नदी काठावर लावण्यात आलेले पेविंग ब्लॉक असमतोल लावलेले आहेत. ते काढून पुन्हा कंत्राटदारास लावण्यास सांगावे. नदीवर असलेल्या बंधाऱ्याच्या पाणी साठ्यात ऊंच कारंजे बसविण्यात यावे. प्रवेशद्वार आकर्षक करावे, धाम नदीच्या दुसऱ्या काठावरील कामही सोमवारी सुरू करावे, तसेच पवनार आणि सेवाग्राम येथे लावण्यात येणारी झाडे वन विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या सल्ल्याने आणि सहभागाने लावावित. सेवाग्राम येथे आश्रमासमोर बांधण्यात आलेल्या डॉरमेंट्रीच्या मागे चांगल्या दर्जाचे फेंसिंग आणि जुने पंप हाऊस पाडून नवीन पंप हाऊसचा प्रस्ताव तातडीने तयार करून मंजूर करून घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक आहे. येथे देशविदेशातून अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे उभारण्यात आलेल्या सर्व वास्तू स्वच्छ आणि नीटनेटक्या राहाव्यात म्हणून देखभाल दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून कायमस्वरूपी निधी देण्याची तरतूद करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सेवाग्राम चौक आणि रस्त्यावरील अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी तात्काळ कामे सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जे.जे.स्कूल ऑाफ आर्टसच्या वतीने एम.आय.डी.सी मध्ये स्क्रॅप पासून तयार करण्यात येत असलेले महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे स्क्लपचरची पाहणी केल्यावर पालकमंत्र्यांनी हे काम युनीक असून त्यासाठी जे जे आर्टस् च्या सर्व टीमचे कौतुक केले. देश विदेशात फिरलो मात्र अशा पद्धतीचे स्क्लपचर पाहिले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगतिले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेले जिल्ह्यातील रस्ते लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक नियमांना धरून आहेत की नाही याची शहानिशा राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी. आणि त्याचा अहवाल सादर करावा.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या नागपूर-यवतमाळ रस्त्यावरील पवनार, सेलू, वर्धा, देवळी, याठिकाणी शहरात येणारे रस्ते हे अपघातस्थळे झाली आहेत. पोलीस विभागाने या रस्त्यांवर वर्षभरात किती अपघात झाले याचा अहवाल सादर करण्याचा सूचना श्री.केदार यांनी दिल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ असे रस्ते योग्य नियमानुसार करून देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच या रस्त्यांवर, रिफ्लेक्टर, सुचना फलक लावावेत. या सुधारणा होईपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरक्षा एजन्सी नेमून चोवीस तास सुरक्षा गार्ड तैनात करण्याच्या सूचना दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते तयार करताना आजूबाजूच्या गावातील रस्ते, पाणी पुरवठा योजना पाईप लाईन, आणि ड्रेनेज यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा सर्व गावात जाऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने नुकसान केलेल्या कामांची दुरुस्ती केली की नाही याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा सूचना केल्या.
दिलीप बिल्डकॉन कंपनीने 6 मीटरपेक्षा जास्त खोदकाम करून मुरूम काढला आहे. खनिकर्म अधिकाऱयांनी यासाठी संबंधित कंपनीवर पेनॉल्टी का लावली नाही असा प्रश्न उपस्थित करून याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गासाठी लागणारा मुरूम, गिट्टी आणि इतर साहित्य वाहतूक करताना आजूबाजूच्या गावातील खराब झालेले रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी यांनी करार करून दुरुस्त करून घ्यावेत असे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेत.
शिवाय राष्ट्रीय महामार्गासाठी माती व मुरूम कोठून आणले याची यादी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
हिंगणघाट, आर्वी, तळेगाव , आष्टी या रस्त्याची कामे करताना दोन्हीबाजूने रस्ता खोदून नागरिकांना वाहतुकीचा त्रास करू नये.एकाच बाजूचा रस्ता पूर्ण करून नंतर दुसऱ्या बाजूने काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.