पोलादपूरच्या ग्रामदैवतांचा गोंधळ मांडला आणि ग्रामप्रदक्षिणेनंतर देव निघाले देवस्थानात


पोलादपूर भैरवनाथनगर सहाणेवर गुरूवारी रात्री ग्रामदैवतांचा गोंधळ मांडल्यानंतर शुक्रवारी ठिकठिकाणी ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरीची आणि रवळनाथाची पालखी फिरून पोलादपूरकरांना दर्शनाचा लाभ घेतला


पोलादपूर : शिमगोत्सवासाठी होळीपौर्णिमेला पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरीची आणि रवळनाथाची पालखी श्रीभैरवनाथ सहाणेवर आली आली. पाच दिवसांचा शिमगोत्सव मोठया उत्साहात सुरू झाला आणि गुरूवारी मध्यरात्रीला ग्रामदैवतांचा गोंधळ सुरू होऊन देवांचा गोंधळ मांडून मान दिल्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ग्रामप्रदक्षिणेसाठी निघालेली ग्रामदैवतांची पालखी शुक्रवारी रात्री उशिरा श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानामध्ये पोहोचल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता झाली. दिवसभरात पोलादपूर शहरामध्ये पालखीपाठोपाठ रंगपंचमी उत्सवाला उधाण आलेले दिसून आले.


पोलादपूर शहरातील श्रीभैरवनाथनगर सहाणेवर होळीपौर्णिमेपासून शिमगोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहात होता. तत्पूर्वी फागपंचमीपासून होळीचा सण सुरू झाला असला तरी या शिमगोत्सवाची रंगत पौर्णिमेपासूनच सर्वांना अनुभवण्यास मिळत होती.


गुरूवारी ग्रामदैवतांचा गोंधळ घालण्यात आला. यावेळी शेकडो भाविक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामदेवतांचा मान आणि समशेलसोनाराच्या चेडयाचा मान दिल्यानंतर रात्री पालखी मिरवणुकीची सभा झाली. यानंतर ग्रामस्थांनी सहाणेवर नैवेद्य आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन शिमगोत्सवाचा आनंद साजरा केला.


पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सावंतकोंड, पार्टेकोंड, जाकमातानगर, प्रभातनगर, आंबेडकरनगर, रोहिदासनगर, हनुमाननगर, गणेशनगर, गोकुळनगर, सह्याद्रीनगर, भैरवनाथनगर, बाजारपेठ, आनंदनगर, शिवाजीनगर, जोगेश्वरी गाडीतळ, तांबडभुवन, सैनिकनगर, साईनाथनगर आदी लोकवस्त्यांमधून ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरीची आणि रवळनाथाची पालखी फिरून पोलादपूरकरांना दर्शनाचा लाभ देत रात्री उशिरा श्रीकाळभैरवनाथ देवस्थानामध्ये पोहोचली.


या शिमगोत्सवकाळामध्ये श्रीकाळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्तमंडळ, भाविक ग्रामस्थ आणि महिला वर्गाने तसेच चाकरमानी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून शिमगोत्सवाचा आनंद द्विगुणित केला.