पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे दूर्लक्ष


देवपूर रस्त्याची मोरी खचून गायीला धरणीने घेतले सामावून


पोलादपूर : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कामाचे दिवसेंदिवस किस्से वाढत असून शुक्रवारी पोलादपूर देवपूर कुडपण आणि पोलादपूर देवपूर कोतवाल रस्त्याच्या एका मोरीवरील साईडपट्टीच्या कमकुवत कामामुळे तेथील साईडपट्टीवर एक गाय चालत असताना मोरी खचून गायीला चक्क धरणीने सामावून घेतल्याची घटना परिसरामध्ये संबंधित ठेकेदाराविरूध्द संतापाची भावना निर्माण करीत आहे.


पोलादपूर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे डेप्युटी इंजिनियर बागूल यांनी कार्यभार सांभाळल्यापासून पोलादपूर उपविभागाच्या कामाचे सातत्याने वाभाडे निघत आहेत. याखेरिज, या उपविभागाचे कनिष्ठ अभियंतादेखील विविध ठेकेदारांच्या हातातले बाहुले बनले असल्याची चर्चा ठेकेदारी क्षेत्रामध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी करीत आहेत. माहितीचा अधिकार वापरणाऱ्या कार्यकर्त्यांना या उपविभागाने नियमबाह्य कामाबाबत विहित मुदतीत तसेच योग्य माहिती न दिल्याने कोकण विभागीय आयुक्तांपर्यंत तक्रारी झाल्या आहेत.पोलादपूर वाई सुरूर रस्त्यावरील खड्डे बुूजविण्यात आले असल्याच्या खोटया बातम्या प्रसिध्द करवून आणत संबंधित ठेकेदाराला काम न करताच बिलांची रक्कम काढण्यासंदर्भात आग्रही असणे, अशा पार्श्वभूमीवर स्थानिकांना ठेकेदार आणि कनिष्ठ अभियंत्यांनी काही ग्रामस्थ व कथित सामाजिक कार्यकर्त्यांना व्यवस्थित हाताळल्याने पोलादपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारीतील पोलादपूर कुडपण जिल्हाहद्द रस्त्यावरील देवपूर गावाजवळील वळणावरील दोन मोऱ्यांचे बांधकाम झटपट उरकण्यात आले.


यानंतर काही कालावधीतच शुक्रवार, दि.13 मार्च 2020 रोजी सकाळी मोरीवरील साईडपट्टीवरून चालत जाणाऱ्या एका गोमातेच्या वजनाने साईडपट्टी खचली आणि चक्क गोमातेला धरणीने सामावून घेतल्याची घटना घडली. यानंतर संबंधित ठेकेदाराबद्दल ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आणि गायीला बाहेर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू झाले. याचदरम्यान, काही ग्रामस्थांनी पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे डेप्युटी इंजिनियर बागूल आणि कनिष्ठ अभियंता पाटील यांना गायीला मोरीच्या पाईपातून बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत पाठविण्याचे आवाहन केले गेले. मात्र, तब्बल दोन तासांपर्यंत त्याकडे दूर्लक्ष केले गेले.सदरच्या घटनेबाबत प्रस्तुत प्रतिनिधींनी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाप्पा बहिर यांना कल्पना दिली असता त्यांनी मंत्रालयामध्ये बैठकीला असल्याचे सांगून संबंधितांना आदेश देण्याचे मान्य केले. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने आणि यंत्रणांच्या सहकार्याने दोन तासांहून अधिक काळानंतर मोरीच्या पाईपामध्ये अडकलेल्या गायीची सुटका करण्यात यश आले.


मात्र, केवळ चालणाऱ्या गायीमुळे साईडपट्टी खचण्याच्या या घटनेनंतर कनिष्ठ अभियंत्यांच्या देखरेखीखाली होणाऱ्या या रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून पोलादपूर बांधकाम उपविभागाच्या डेप्युटी इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर्सवर तातडीने कारवाई करून त्यांची येथून बदली करण्याची मागणी तालुक्यामध्ये होत आहे.